मोबाईलचा अतिरेक अर्थात ‘नो-मो’फोबिया
“नो-मो’फोबिया हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. अशा प्रकारचा आजार झालेल्या व्यक्ती मोबाइल शिवाय राहूच शकत नाहीत. त्यांना फोन हरवण्याची, बॅटरी संपण्याची, नेटवर्क नसण्याची सततची भीती असते. अशा व्यक्ती सतत मोबाईलमध्येच व्यस्त असतात. हळूहळू ते कुटुंबापासून लांब होऊन आपल्याच विश्वात रममाण होताना दिसतात. एवढेच नव्हे तर त्यांना तहान-भूक याचीही शुद्ध राहात नाही. थोडक्यात काय तर त्यांचा वैयक्तिक विकासाचा मार्ग खुंटतो व घसरणीला लागतो.तंत्रविज्ञानात जसजशी प्रगती होत गेली तसतशी नवनवीन आव्हानेही पुढे येऊ लागली आणि नव्या प्रकारचे टेक्नो फोबिया अस्तित्वात आले. यातीलच एक फोबिया म्हणजे नोमोफोबिया. वर्ष 1983 मध्ये पहिला मोबाईल फोन बाजारात आला आणि आज सर्वाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवून बसला आहे. आजची तरुणाई ज्या पद्धतीने स्मार्टफोन वापरते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यालाच चिकटलेली असते, ते पाहता त्यांना स्मार्टफोनचे व्यसन लागलेय असे म्हणावयास काहीच हरकत नाही.
वैद्यकीय क्षेत्रात याच व्यसनाला नोमोफोबिया असे संबोधण्यात आले. नोमोफोबिया म्हणजे “नो मोबाईल फोबिया’ म्हणजेच काय तर मोबाईल जवळ नसल्यावर अस्वस्थ, बेचैन व्हायला होणे, मोबाईलविना बसण्याची भीती वाटणे. विज्ञानाचा एक चमत्कारी आविष्कार म्हणजे मोबाईल फोन किंवा तळहातावरचा जीवाभावाचा सोबती म्हणजे मोबाईल फोन होय. दिवस-रात्र सतत काम करणारे हे छोटेसे यंत्र. मोबाईलची उपयुक्तता नाकारता येणे शक्यच नाही; पण याचा अतिवापर किती धोकादायक आहे, हे समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
नोमोफोबिया हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. ज्यामुळे अशा व्यक्ती मोबाईलशिवाय राहूच शकत नाहीत. वर्ष 2008 मध्ये इंग्लंडमध्ये नोमोफोबियाचा पहिला रुग्ण पाहावयास मिळाला. जगभरातील नोमोफोबियाविषयी अभ्यास केला असता असे आढळून आले की, इंग्लंडमध्ये तब्बल 66 टक्के लोकांमध्ये नोमोफोबियाची लक्षणे दिसून आली.
त्यांना फोन हरवण्याची, बॅटरी संपण्याची, नेटवर्क नसण्याची सततची भीती असते. गेल्या चार वर्षात नोमोफोबियाचे प्रमाण 65 टक्के वाढले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये नोमोफोबियाची लक्षणे सर्वात जास्त दिसून आली. पुरुषांचे 66 टक्के तर स्त्रियांचे 71 टक्के असे हे प्रमाण होते.
मोबाईल वापरासंबंधात भारतातील एका मेडिकल कॉलेजमधील 22 ते 24 वर्ष वयोगटातील 24 हजार 800 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले असता, असे दिसून आले की, 97 टक्के मुलांकडे इंटरनेट होते, त्यातील 61 टक्के मुले इंटरनेटच्या वापराचे पैसे महिन्यातून एकदाच भरत होती, तर 28 टक्के मुले महिन्यातून दोनदा तर 11 टक्के मुले तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा रिचार्ज करत होते. यावरून असे दिसून येते की, तरुणवर्गात इंटरनेट वापराची आसक्ती किंवा व्यसन मोठया प्रमाणात आहे.
यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ 15 टक्के मुले इंटरनेटचा वापर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून करत होते तर बाकीची मुले फक्त फेसबुक, ई-मेल, व्हॉट्सऍप, गेम्स व इतर सोशल नेटवर्किंग साईट्स पाहण्यासाठीच करत होते. या सर्वेक्षणातून असेही पुढे आले की 83 टक्के मुले त्यांचा मोबाईल फोन त्यांच्यापासून दूर झाल्यावर बेचैन झाले. त्यांना डोकेदुखी व त्रास होऊ लागला व निरुत्साह जाणवू लागला. याला कारण म्हणजे मोबाईल फोनचा अतिवापर हे होय. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर देखील जाणवू लागला.
सतत एकमेकांना मेसेज पाठवणे, रात्रंदिवस फोनवर बोलणे, अशा गोष्टी करत असताना असे तरुण-तरुणी आपल्या कुटुंबापासून लांब होऊन आपल्याच विश्वात रममाण होताना दिसतात. एवढेच नव्हे तर त्यांना तहान-भूक याचीही शुद्ध राहात नाही. थोडक्यात काय तर त्यांचा वैयक्तिक विकासाचा मार्ग खुंटतो व घसरणीला लागतो.
नोमोफोबिया कोणत्या स्तरापर्यंत असतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे विमानात बसल्यानंतर किंवा विमान उतरल्यानंतर धावपट्टीवर असताना मोबाईल फोनवर बोलण्यासाठी लोकांची होणारी तगमग पाहायला हवी. आपल्या मोबाईलच्या वेडापायी विमानातील सर्व प्रवाशांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता असते याची जाणीवही या लोकांना नसते.
अगदी 5 ते 7 वर्षाची मुलेदेखील मोबाईलचा वापर सर्रास करताना दिसतात आणि याबाबत पालक मुलांचे कौतुकच करतात. परंतु त्यांना हे माहीत आहे का, की हाय फ्रिक्वेन्सी मॅग्नेटिक फिल्ड मेंदूसाठी व रक्तासाठी फारच हानिकारक आहे. भारतात आज युवा किंवा 13 ते 18 वयोगटातील तरुण दररोज सरासरी 13 ते 15 तास इतका फोनचा वापर करतात आणि विशेष म्हणजे त्यात उपयुक्त गोष्टींसाठी वापर फारच कमी होतो.
भारतातील 19 शहरातील चार हजार स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे सर्वेक्षण केले असता असे दिसून आले की, स्मार्टफोनच्या दैनंदिन वापरात भारतीयांनी अमेरिकेच्या नागरिकांना देखील मागे टाकले आहे. मोबाईल वापरावर टीका करणाऱ्यांना नेटकरांनी त्यांच्या पद्धतीने सोशल साईटवरूनच उत्तर दिले आहे.
मागील पिढीने सास-बहूच्या सीरियल बघण्यात घालवलेला वेळ किंवा त्या आधीच्या पिढीने एक एक सिनेमा 10-15 वेळा पाहण्यात घालवलेला वेळ व आजची तरुण पिढी मोबाईलवर घालवत असलेला वेळ पाहता मागच्या पिढीने आमच्यावर टीका करू नये. मात्र मोबाईल उपकरण हे कधीच निर्जीव नसते. ते कायम सूक्ष्म लहरींची देवाण-घेवाण करत असते. म्हणजेच सततच्या वापराने आपल्या शरीरावर त्या लहरींचा हळूहळू प्रभाव होत असतोच.
मोबाईलच्या अति आणि सततच्या वापराने पाठीच्या कण्यावर खूप प्रेशर येते. कारण मोबाईल वापरताना आपली मान 60 डिग्री मध्ये खाली झुकलेली असते. मोबाईल फोनमुळे शारीरिक व मानसिक ताकद खर्च होऊन आळशीपणाही वाढत चालला आहे.
याच्या अतिवापराने चिडचिड होणे, एकलकोंडेपणा निर्माण होणे, डोळ्यांची जळजळ व लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. वेळेचे व्यवस्थापन देखील कोलमडते. त्यामुळे वेळीच मोबाईल वापरावर नियंत्रण आणले तर त्याचे व्यसन लागत नाही.
“नो-मो’फोबियापासून सावध करण्यासाठी सूचना.
स्मार्टफोनचा वापर स्मार्टली करणे आवश्यक. उगाचच अनावश्यक ऍप किंवा गेम्स घेणे टाळावे. नोटिफिकेशन बंद ठेवा, कारण सततची येणारी नोटिफिकेशन्स आपले लक्ष विचलित करतात. मेसेज व इतर गोष्टी पाहण्यासाठी ठरावीक वेळ ठरवा. जेणेकरून फोन सतत हातात राहणार नाही. झोपताना फोन बंद ठेवा म्हणजे झोपही छान येईल व फोनच्या धोकादायक किरणांपासून संरक्षण मिळेल.
या सर्व गोष्टींचा विचार केला असता त्या अमलात आणणे कठीण नाही, फक्त त्याला जरा वेळ द्यावा लागेल. व्यसन सोडावयाचे म्हणजे वेळ हा द्यावा लागणारच. परिसरात असणाऱ्या व्यक्ती/ मित्र/ शेजारी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क ठेवण्याचे अनेक अप्रत्यक्ष फायदेही असतात. हे ध्यानात ठेवायला हवे
No comments: