Hartalika Vrat Katha 2023 : आज सोमवार, 18 सप्टेंबर, आज हरतालिका तृतीया व्रत आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. हे व्रत केल्याने भगवान शिव (Lord Shiva) आणि देवी पार्वतीची (Goddess Parvati) कृपा होते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी धारणा आहे. भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यातील अतूट नाते लक्षात घेऊन हरतालिका तृतीया हा सण साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया 16 शृंगार करतात आणि पूजा करतात, तसेच अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त करतात. पण तुम्हाला या मागची हरतालिकेची पौराणिक कथा माहित आहे का? मान्यतेनुसार, फक्त हरतालिका तृतीयेची कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो, सुख, शांती आणि समृद्धी वाढते. ही कथा अत्यंत पवित्र मानली जाते, म्हणून हरतालिका तृतीयेची कथा या दिवशी अवश्य ऐका किंवा वाचा
हरतालिका तृतीया कथा वाचा किंवा ऐका! मनोकामना होतील पूर्ण
सर्वात आधी शिव-पार्वती म्हणजेच भवानी शंकराची पूजा केली जाते. पूजा सुरू करण्याआधी मी तुला नमस्कार करते. अशी प्रार्थना करून कथा ऐकली जाते.
पौराणिक कथा अशी की, एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारले, ''देवा, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? कोणत्या पुण्याईमुळे मी आपली पत्नी झाले, हेही मला सांगा.'' तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस.
हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केले. 64 वर्षं झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलंस. हे तुझी निष्ठा पाहून तुझ्या वडिलांना म्हणजे हिमालयाला फार दु:ख झाले, अशी कन्या कोणाला द्यावी? अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारदमुनी आले. तुझ्या वडिलांनी त्यांची पूजा केली आणि त्यांना येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, ''तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. विष्णू तिच्यासाठी योग्य आहेत. त्यांनीच मला इथे पाठवले आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली''
नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. विष्णूच्या या स्थळाविषयी हिमालयाने पार्वतीला सांगितले. परंतु, तिला ही गोष्ट रुचली नाही. ती अत्यंत क्रोधित झाली. सखीने तिला रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा पार्वतीने घडलेली हकीकत सांगितली. महादेवा शिवाय दुसरा पती करायचा नाही, असा तिचा ठाम निश्चय होता. परंतु, हिमालयाने तिच्यासाठी विष्णू वर निश्चित केला होता. सखीने तिला घोर अरण्यात नेले. तिथे एक नदी होती. सखी आणि पार्वतीने तिथे शिवलिंगाची स्थापना केली. पार्वतीने त्या लिंगाची मनोभावे पूजा केली. तो पूर्ण दिवस उपवास केला. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस होता. पूर्ण रात्र शंकराचे नामस्मरण केले. या व्रताच्या सामर्थ्याने शंकराचे कैलासावरील आसन हलले आणि त्याने तुला दर्शन दिले. वर मागण्यास सांगितल्यावर पार्वतीने शंकर आपले पती व्हावे ही इच्छा व्यक्त केली. शंकरांनी तथास्तु म्हटले.
पुढे दुसर्या दिवशी ती व्रतपूजा पार्वतीने विसर्जन केली. सखीसह उद्यापन केले. इतक्यात हिमालय पार्वतीला शोधत वनात आला. पार्वतीने निघून येण्याचे कारण सांगितले तसेच व्रताची हकीकतही सांगितली. हिमालयाने पार्वतीला शंकराशी विवाह करून देण्याचे वचन दिले आणि पार्वती घरी आली. यानंतर पार्वती आणि शंकराचा विवाह झाला. हे व्रत मनोभावे करण्याऱ्या कुमारिकांना त्यांचा इच्छित वर प्राप्त होईल. अशी कथा महादेवांनी पार्वतीला सांगितली.
हरितालिका शुभ मुहूर्त
हरतालिका तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विधी, नियमानुसार पूजा केल्यास अखंड सौभाग्य प्राप्त होते. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका तृतीया साजरी केली जाते. पंचागानुसार, तृतीया तिथी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:08 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 पर्यंत असेल. परंतु हे व्रत (Vrat) सोमवारी 18 सप्टेंबरला केले जाईल. सकाळी 6 ते रात्री 8.24 पर्यंत पूजेसाठी योग्य वेळ आहे.
Hartalika Puja Sahitya And Puja Mandani:
भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती, गणरायाच्या आगमनामुळे आपण सुखावलेले असतो आणि या महिन्यात अनेक व्रतवैकल्य केली जातात. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरितालिका व्रत केले जाते. या व्रतासाठी पुजेचे साहित्य आणि पत्री यांचे फार महत्त्व आहे. या व्रतामध्ये पुजेची खास मांडणी असते त्याबदद्ल अधिक जाणून घेऊया.हरितालिका पूजा साहित्य
हरितालिकेच्या मूर्ती (दोन) व शिवलिंगअत्तरफाया , हळदकुंकू , चंदनगंध , अष्टगंध , गुलाल , बुक्का , अक्षता , रांगोळी , उदबत्ती , कापूर , आगपेटी , सुटीनाणी ६ , तुपाच्या व तेलाच्या वाती , कापसाची वस्त्रे – १६ मण्यांचे १ व ५ मण्यांचे १ , तांदूळ ( वाटीभर ) पंचामृत ( दूध , दही , तूप , मध , साखर ) गूळखोबरे , नैवेद्य , सुंठवडा ( डिंकवडा ), चौरंग / पाट , आसन, पाण्याचा कलश , शंख , घंटा , समई , निरांजन, कापूरारती , पळीपंचपात्र , ताम्हण, देव पुसण्याचे वस्त्र , हातपुसणे, तसराळे, काडवाती
साहित्य
फुले , दूर्वा, तुळस, विड्याची पाने १२ , सुपाऱ्या ६ , बदाम ५ , खारका ५ , नारळ २ , शहाळे, फळे ५ / केळी ५ , पेढे ५ / खडीसाखर, कापसाची वस्त्रे, जानवे, कापूर, उदबत्तीपत्री
बेल,आघाडा,मधुमालती,दूर्वा,चाफा,कण्हेर,बोर,रुई,तुळस,आंबा,डाळिंब,धोतरा, जाई, मरवा,बकुळ,अशोक.( उपलब्ध होतील त्याप्रमाणे )सौभाग्यवाण
पत्रावळीवर किंवा ताटात – हळदकुंकू , तांदूळ , वस्त्र , पानसुपारी , नाणे , नारळ , गजरा / वेणी , शिधा तसेच ; फणी , काजळ , गळेसरी , कांकण , आरसा इत्यादीहरितालिका पूजेची मांडणी कशी करावी?
- चौरंगा किंवा पाट घ्या आणि त्याच्यावर तांदळाच्या सपाट ढिग करा.
- त्यावर गौरी व हरिताली यांच्या मूर्ती ठेवून त्यासमोर वाळूचे लिंग तयार करावे किंवा आपापल्या प्रथेप्रमाणे पूजेची मांडणी करावी.
- उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा.
- समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.
- चौरंगाजवळ तेलवात करून समई ठेवावी.
- प्रथम सुवासिनीकडून/कुमारिकेकडून किंवा स्वत: हळदकुंकू लावून घ्यावे. त्यानंतर घरातील देवांसमोर विडा ठेवून, अक्षता व हळदकुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा.
हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा अगदी स्वच्छ असावी. चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभीत कराव्यात. सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करावी.
या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात
No comments: