सर्वात सामान्यत: आढळणारा मुतखड्याचा प्रकार म्हणजे कॅल्शियम ऑब्झॅलेट स्टोन्स. त्याचबरोबर कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स, सिस्टिन स्टोन्स, युरिक अॅसिड स्टोन्स हे प्रकार आहेत.
उपचार.
पोटात दुखण्याची कळ, जागा यावरून मुतखड्याची शंका आल्यास वेळीच डॉक्टरला दाखवावे. पोटाची सोनोग्राफी, एक्स-रे केल्यास मुतखड्याचे आकारमान, स्थान व खड्यांची संख्या समजते. लघवी, रक्त, खड्याची तपासणी आणि लिथोरिक्स प्रोफाइल या सारख्या तपासण्या करणे अत्यंत गरजेचे आहे. पोटातील प्रत्येक दुखणे मुतखड्यामुळेच असेल असे नाही. त्यामुळे मुतखड्याच्या शंकेनंतर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
मुतखडा लहान असेल तर तो औषधांनी लघवीवाटे वाहून जाऊ शकतो. मात्र, मोठा खडा काढून टाकण्यासाठी अन्य उपचारांची गरज असते. वैद्यकीय ज्ञान व अद्ययावत तंत्रज्ञानामुळे मुतखड्याच्या शस्त्रक्रियांची उपचारपद्धती अत्यंत सोपी झाली आहे.
लिथोट्रिप्सी पद्धत : रुग्णाच्या शरीराच्या बाहेरून यंत्राद्वारे खड्याला सूक्ष्म ध्वनिकंपनाने शॉक देऊन त्याचा चुरा करणे. यामध्ये खड्यांचा चुरा लघवीवाटे बाहेर पडतो. त्यामुळे उपचारानंतर रुग्णाला भरपूर पाणी प्यायला सांगितले जाते. या पद्धतीत शस्त्रक्रियेची गरज नाही. शरीरातील कोणत्याही अवयवावर आघात किंवा जखम केली जात नाही.
परक्युटॅनिअस नेफ्रोलिथोटॉमी : या उपचारपद्धतीमध्ये दुर्बिणीच्या साह्याने शस्त्रक्रिया करून खडा शरीरातून बाहेर काढला जातो. दुर्बिणीद्वारे खडा काढण्याची ही उपचार पद्धती मूत्रपिंडातील व वरच्या मूत्रवाहिनीतील विविध प्रकारच्या मोठ्या खड्यांसाठी जास्त योग्य आहे.
युरेटेरोस्कोपी : मूत्रवाहिनीत असलेले खडे युरेटेरोस्कोपीद्वारे काढता येतात.
उपाय :
जास्तीत जास्त पाणी पिणे हा निरोगी आयुष्यासाठी आणि मुतखड्यासारख्या विकारावर आळा घालण्यासाठी उत्तम उपाय आहे. मुतखड्यांना रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज पुरेसे पाणी म्हणजेच दररोज आठ ते १२ कप पाणी पिणे आवश्यक आहे. आहारामधील सोडियम आणि प्राण्यांच्या मांसातून मिळणारी प्रथिने (मांस, अंडी) नियंत्रित ठेवल्यास मुतखड्यांचा त्रास टाळण्यास मदत होऊ शकते. मुतखडा होण्याची प्रवृत्ती टाळण्यासाठी जवाचे पाणी, उसाचा रस, काकवी यांचे सेवन करावे. मूत्रपिंडामध्ये होणाऱ्या मुतखड्यांच्या निर्मितीचे कारण डॉक्टरांना कळल्यास भविष्यात मुतखड्यांच्या निर्मितीस प्रतिबंध करण्यास मदत होईल व त्यासाठी विशिष्ट आहार डॉक्टर रुग्णांना देऊ शकतील.
No comments: