नाडि याचा अर्थ शुद्ध रक्त वाहून नेणारी नलिका अर्थात रोहिणी. छातीमध्ये डाव्या बाजूला हृदय असते. हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे सर्व शरीरभर रक्ताचे वहन होत असते. रोहिण्यांद्वारा हृदयातील शुद्ध रक्त संपूर्ण शरीरभर पोहोचवले जाते. साहजिकच रक्त दाबाखाली वाहत असते. शरीरातील सर्वच राहण्यांमध्ये हृदयाच्या आकुंचनाबरोबर रक्तप्रवाहानुरुप लहरी किंवा कंपने निर्माण होतात.
बोटाने आपण रोहिणीला स्पर्श केल्यास ती वरखाली होते आहे असे जाणवते. बोटांनी नाडीचा अभ्यास करणे यालाच नाडीपरीक्षा असे म्हणतात. सामान्यतः मनगटामध्ये अंगठ्यापासून सरळ खालच्या रेषेत दोन बोटांनी स्पर्श केल्यास नाडीची परीक्षा करता येते. अर्थात शरीराच्या पाय, मांडी, मान, दंड अशा इतर भागातील रोहिण्यांचीही या पद्धतीने तपासणी करता येते. परंतु सामान्यत: मनगटातच नाडीची तपासणी करतात.
नाडीची तपासणी करताना नाडीचा दर, दाब, ताण नियमितता आदी गोष्टींची नोंद घेतात. निरोगी माणसाच्या नाडीचा दर मिनिटाला ६० ते १०० इतका असतो. रक्तक्षय, बेरीबेरी, थायरॉईड ग्रंथीचे काही रोग यांत हा दर खूप वाढतो. खूप व्यायाम केल्यानंतर किंवा तापातही नाडीचा दर वाढतो.
हृदयाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम झाल्यास नाडीचा दाब, ताण कमी होतात. हृदयाच्या झडपांच्या आजारात नाडीचा दाब खूप वाढतो. रक्तदाबाच्या तपासणीतही नाडी तपासावी लागते.
थोडक्यात सांगायचे झाले तर, शरीराच्या आरोग्याचा आरसा म्हणजे नाडी. हृदयाच्या कार्याविषयी तर या तपासणीमुळे माहित मिळतेच, पण 'सर्व शरीराची नाडी' ही या नाडीपरीक्षेने आपल्या हातात येते ! हृदयाचे कार्य थांबले तर नाडी हाताला जाणवत नाही
No comments: